गजाननकाका

गजानन गोविंद कानिटकर किंवा गजाकाका हे माझ्या वडीलांचे मावसभाऊ. त्यांच्या ठाण्याला राहणाऱ्या (पण मुळच्या कोकणातल्या) ताईमावशीचे चिरंजीव!

गजानन काका बरीच वर्षे कोकणातच राहिल्यामुळे माझे व त्यांचे भेटीचे प्रसंग फारच कमी आले. आधी तेय काही वेळा औरंगाबादला यायचे त्यावेळी मी लहान होतो. नंतर मुंबईला आल्यावर ते ठाण्याला आले असतील तर भेट व्हायची. पण मला त्यांची अगदी सुरवातीची आठवण म्हणजे ते आमच्या औरंगाबादच्या घरी होते तेव्हा. त्यावेळी मी खूपच लहान होतो.

त्यांच्या घाऱ्या डोळ्यांची आणि उंच स्वरात बोलण्याची मला भीती वाटायची. परंतु ते मला जवळ बोलावून हळूच खिशातून एक नाणं बाहेर काढायचे…आणि बॉलपेन घेऊन माझ्या छोट्या मनगटावर एक सुंदर घड्याळ काढून द्यायचे. घड्याळ काढल्यावर ते नाणं मला बक्षीस मिळायचं. त्यानंतर माझी भीती कुठल्याकुठे पळून जायची. आणि मी ते घड्याळ घरातल्या सर्वांना दाखवत हुंदडायचो.

gajakaka.jpgत्या काळात माझ्या मोठ्या आत्याचं (सौ मंगल आत्याचं) लग्न ठरलं. त्याकाळात त्यांनी औरंगाबादला एक उपहारगृह सुरु केलं होतं. त्यांचा अजून जम बसायचा होतं. कै. नानांनी विचारपूर्वक लग्नाच्या कामांची आखणी केली होती. त्यात त्यांनी गजाननकाकांना पुण्याहून येणाऱ्या पाहुण्यांच्या चहा-कॉफीची सोय बघण्यास सांगितले, आणि त्यांना हवं असलेलं सर्व साहित्य पुरवलं. झालं!! गजाननकाकांनी वऱ्हाड आल्यापासून ते परत निघेपर्यंत ही खिंड अगदी व्यवस्थित सांभाळली. त्या २४ तासात ज्यांना कोणाला चहा/कॉफी/दुध जे-जे म्हणून हवे होते, ते-ते त्यांनी स्वतः बनवून दिले! ही कामगिरी त्यांनी इतकी चोख बजावली की सगळ्या पाहुण्यांनी, ‘अशी सोय कुठे पाहिली नाही बुवा!” अशी प्रशस्ती दिली!

 

त्यांच्या ह्या कामसूवृत्तीला आणि सचोटीला मात्र उपाहारगृहाचं आर्थिक गणित काही जमलं नाही. दुर्दैवाने त्यांना उपाहारगृहाचा गाशा गुंडाळावा लागला. कालांतराने ते कोकणात त्यांच्या गावी, म्हणजे अडूरला रहायला गेले. नंतर उन्हाळ्यात त्यांच्या ठाण्याच्या घरी आले असतील तेव्हा भेटायचे. त्यांनी तिकडून आंबे आणलेले असायचे, आणि घरभर त्याच्या आढ्या लावलेल्या असायच्या.

‘अडूरच्या घरी या’ असे नेहमी म्हणायचे, ‘पण येताना कणीक आणा बरंका, कारण आमच्याकडे मिळत नाही. आम्हाला आमटी-भात चालतो, परंतु तुमच्या मुलांना पोळ्या खायची सवय आहे ना, म्हणून सांगतोय…!’ … हे सांगायला विसरायचे नाहीत.

काल ते गेल्याची बातमी कळली आणि मनात त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या….कोकणी माणसाची सर्व गुणवैशिष्ठ्ये त्यांच्यात बघायला मिळायची. पु.ल.देशपांडे यांच्या ‘अंतुबर्वा’ प्रमाणे कधी त्याचं बोलणं मन विषण्ण ही करायचं…

हा अंतरबाह्य कोकणी माणूस आंब्याच्या पर्व काळात देवाघरी गेला हा ही एक दैवी संकेतच असावा!! हातावरच्या खऱ्या घड्याळाकडे बघून त्यांनी काढलेलं खोटं घड्याळ आठवलं!!

त्यांना आमची आदरांजली…ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास शांती देवो ही प्रार्थना.