गुरु पुराण |१| मधुसूदन मनोहर

Manoharsमाझा मामा म्हणजे मधुसूदन मनोहर (…मनोहर हेच त्याचे आडनाव आहे!) हा माझा तबल्याचा गुरु. मी औरंगाबादला घरी आई, दादा, आणि आबाकाकांकडून तबला वादन शिकायला सुरवात केली असली तरी तबल्याचं ‘कायदे’शीर शिक्षण मला मामा कडूनच मिळालं. ही तालीम मोठी विलक्षण होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत ठाण्याला, दोन – तीन आठवड्याच्या मुक्कामात आम्ही (म्हणजे मी आणि माझा भाऊ श्रीकांत) मामाकडून नवीन ‘कायदे’कानून (!) शिकायचो. त्यानंतर औरंगाबादला जाऊन पुढचे वर्षभर या मिळालेल्या कायद्यांची ‘अंमळ’ ‘बजावणी’ चालायची. तिथे माझी आई केवळ स्थानिक गुरुच नव्हे तर गुरुभगिनीही असायची. थोडक्यात मामानी दिलेल्या शिदोरीवर आम्हा तिघांची गुजराण चालायची. पुन्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत येऊन नवीन शिदोरी.

त्या काळचा हा नाविन्यपूर्ण उन्हाळी वर्ग अतिशय वेगळ्या पद्धतीने चालायचा. रात्री आठ वाजेपर्यंत मामा दमून-भागून घरी यायचा. त्यानंतर सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर सार्वजनिक दूरदर्शन हा कार्यक्रम सुरु व्हायचा. परंतु आम्ही दोघं मात्र, आतल्या खोलीत फ्रीज आणि पलंग यांच्या मधील जागेत तबल्याच्या दोन जोड्या मांडून, आज किती सराव केला याचं प्रात्यक्षिक मामाला दयायचो. मामा ते ऐकून (आणि बऱ्याचदा वैतागून) आम्हाला पुढचा कायदा शिकवायचा. कधी-कधी “आधीचा कायदा नीट घटवून घ्या रे, आणि मगच नवीन कायदा सुरु करा”, असा ‘सज्जन’ दम भरायचा. आमचं अर्ध लक्ष बाहेरच्या ‘चित्रहारा’च्या आवाजाकडे असायचं आणि उरलेलं मामाच्या ‘चक्रधारा’ कडे.   

दिवसा आम्ही जर सराव केला नाही तर ते रात्रीच्या वाजवण्यातून मामाला लगेच लक्षात यायचं आणि तो रागवला की आम्हाला मात्र आमची लाज वाटायची. मामाला घरी यायला कितीही उशीर झाला तरीही आमच्या शिकवणी नंतर एकटाच रियाज करताना आम्ही नेहमी बघायचो. बऱ्याच वेळा इतरांना त्रास होऊ नये म्हणून मामा तबल्यावर सतरंजी टाकून तबला वाजवायचा. परंतु त्याने रियाझ करणं काही सोडलं नाही.

त्याच्याकडे असलेलं तालदर्शक यंत्राचं (ज्यानं एका विशिष्ट लयीमध्ये आवाज यायचा) आम्हाला प्रचंड औत्सुक्य वाटायचं.  मामाकडे दोन विशिष्ट तबले होते. एक मोठ्या तोंडाचा (ज्याला ढाल्या तबला म्हणतात असा) आणि दुसरा थोड्या लहान तोंडाचा पण उंच स्वराचा. ह्या उंच स्वराच्या तबल्यावरून आमच्यात नेहमी भांडणं व्हायची, कारण आम्हा दोघांपैकी कोणालाही त्या ढाल्या तबल्यावर योग्य वजन वापरून तबल्याचे बोल काही काढता यायचे नाहीत. मग अखेर एकदा श्रीकांत आणि एकदा मी अशा प्रकारे समेट व्हायचा.

मामाकडून जेव्हा त्याच्या तालमीची गोष्ट कळली त्यानंतर आम्हाला आमच्या तालमीचं अप्रूप वाटणं बंदच झालं. इतर सर्व गुरुंपेक्षाही मुंबईत उ. अमीरहुसैन खासाहेब यांच्याकडे मामा ज्या चिकाटीने शिकला ते केवळ अद्वितीयच म्हणावे लागेल. परळचं ऑफिस संपवून मामा त्यांच्या घरी म्हणजे कामाठीपुऱ्यात संध्याकाळी पोहचायचा. त्या भागात रात्रीच्या वेळी खासाहेबांच्या घराच्या शिकवणीत वेळेची मोजदाद नसायची. कधी कधी एखादा कायदा वाजवायला सांगून खासाहेब अंतर्धान पावायचे आणि मग सुरु व्हायचा एक अविरत रियाझ. ही क्रिया रात्री उशिरा ‘अब बस करते हैं’ असं म्हणल्यावरच संपायची. खाली आल्यावर लक्षात यायचं की येथे आता काहीही खाण्याची सोय नाही. मग खारे दाणे किंवा केळी अशा खाण्यावर दिवस संपवून मामा घरी परतायचा. इतक्या विलक्षण पद्धतीने त्याने अनेक वर्ष खासाहेबांकडून तालीम घेतली. आणि महत्वाचं म्हणजे ती रियाजाची सवय त्याला आजतागायत आहे.

पुढे अनेक प्रकारे तबला शिक्षण घेत, मामा कै. पं. भाई गायतोंडे यांचा शिष्य बनला! ऐच्छिक सेवानिवृत्ती नंतर तर मामाला मस्त लय सापडली. ठाण्यात त्याला समविचारी कलाकार मिळाले, आणि एक सुंदर आवर्तन सुरु झालं. त्या काळात मामा एका छान धुंदीत असायचा! तबला वादकांच्या भेटी, सहयोग ला कार्यक्रम, आणि भाईंचा सहवास! एका गुरुपौर्णिमेला आम्ही मुद्दाम गेलो होतो. सर्व शिष्यांनी एका पेक्षा एक तबला वादन सादर केलं. मामाने ही छान वाजवलं. भाई वाजवायला बसणार ह्या कल्पनेनं आम्ही चांगलेच उत्सुक होतो. तेवढ्यात भाईंनी मामाला बोलवून त्याच्याकडून त्यांचा तबला लावून घेतला. मामाचा सच्चा सूर त्यांनी खरोखर हेरला होता!

पुढे ‘मोठे’ झाल्यावर आमची शिकवणी हळू हळू मागे पडली! तबला वादन सुटले नाही, परंतु इतर गोष्टींचे प्राधान्य वाढले. वाईट ह्याचं वाटतं की, औरंगाबादहून उन्हाळी सुट्टीत तबला शिकणारा समीर, मुंबईत स्थायिक झाला. अनेक वेळा मामाच्या घरी गेला. अनेकदा मुक्कामीही राहिला, परंतु तबल्याची शिकवणी काही होऊ शकली नाही! 

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: