Impact of online content

I have been running a series of blog posts, for last one month, which are in Marathi, and dedicated to my grandmother. I had to take a break for two reasons: a) It is becoming exhaustive for me to churn out articles..and b) I came across an interesting scenario, which needs to be shared urgently!

I have been offering MOOCs for last 3 years now, but never tried to probe the impact it has on the society in general. Last month, I was requested by a learner from my course, to deliver the sessions in Hindi, for better understanding! He was quite diplomatic in his preposition, “Your English is easy to understand than the foreign video lectures on YouTube, however, it would be easier if you use Hindi”.  I was also seriously considering to record the next one in Hindi, and that’s when I thought od searching for it if someone has done it already! I checked out, and found that there are many YouTube Channels, offering Blender tutorials in Hindi. One prominent name there, was LS Technologies.

LS

When I saw the playlist of the Blender tutorials, it was almost on the lines of my course. Getting curious, I called the person mentioned there. Murleedhar Sharma aka Lee Sharma. He was not only awestruck, but shocked to get my call. He told me that he had completed my course, and got the idea of Hindi tutorials, for the benefit of Hindi speaking viewers, and got started with it right away. His introductory video explains IITBombayX website, and talks about the course, and gives all the key information.

LS_SS

I was extremely happy to see this effort. I could see hat his channel is well subscribed with over 34000 subscribers and 21 lakhs of views. Now he is creating a series on architectural modeling, and is quite popular! I could feel his passion for creating the local language content. There was absolutely no problem for me, since the course is released in open course. I could also see his acumen for knowing the pulse of the viewers and catering to their demands! That is what we call as ‘Learner-Centric’ approach!

All the best LS Technology!! May you reach newer heights!

 

Advertisements

१५ | मु. पो. नेवासा

Mohiniraj_Newasa.png

नानांची बँकेत नोकरी असल्यामुळे, आजीला त्यांच्या संसार अनेक ठिकाणी हलवावा लागला! पण, हे सर्व ज्या लग्नामुळे सुरु झालं, ते नाना-आजीचं लग्न, नेवासा ह्या छोट्याश्या गावात झालं! नेवाश्याला नानांचे भाऊ, बेहेरे रहायचे. त्यांच्या वाड्या समोरच्या श्री मोहिनीराज मंदिरात चि. सौ. कां. सुनंदा हरी करंदीकर, ही सौ. सुनंदा सिद्धेश्वर सहस्रबुद्धे झाली! तो रंगपंचमीचा दिवस होता! आणि हो, त्या काळी रंगपंचमीलाच रंग खेळायचे! धुळवडीला नाही!

नंतरच्या काळात आमच्याकडे रंगपंचमीचं विशेष प्रयोजन नाना-आजीच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून होत नसे. तथापि, नाना रंगपंचमी वेगळ्याच, म्हणजे अगदी शाही पद्धतीने साजरी करायचे! काही दिवस आधी, ते आमच्या पिढीजात शिंपीकाकांकडून (औरंगपुरा येथील मालवेकाका) पांढरा झब्बा-पायजमा शिवून आणायचे! क़्वचित प्रसंगी झब्ब्याचा रंग बदामी असायचा! रंगपंचमीच्या दिवशी, आंघोळ झाल्यावर नाना तो नवीन झब्बा पायजमा घालायचे! त्याच वेळी, आजी एका चांदीच्या वाटीत केशरी रंग तयार करून द्यायची. आम्ही मुलं त्या रंगात बोटं बुडवून नानांच्या कपड्यांवर उडवायचो! त्याचे केशरी डाग अनेक दिवस त्या झब्ब्यावर असायचे, आणि एरवी स्वच्छतेच्या बाबतीत काटेकोर असणारे नाना, त्या डागांकडे दुर्लक्ष करायचे! ‘कुछ दाग अच्छे होते है’, ही जाहिरात येण्याअगोदर कितीतरी वर्ष!

नेवाश्याबद्दलची ओढ काही वर्षांनंतर माझ्या वडिलांची तिथे बदली झाल्यावर पुन्हा ताजी झाली. आई-दादा तिथे होते, आणि त्यांच्या बरोबर श्रीकांत (माझा लहान भाऊ), आणि नीलिमा (माझी धाकटी बहिण) हे होते. मी औरंगाबादला आजी-नाना, आणि माझ्या काका-काकूंबरोबर असे. एरवी नानांना प्रवास आवडायचा नाही, परंतु, -औरंगाबाद-नेवासा हा प्रवास ते आनंदाने करायचे! त्या छोट्या (२ तासांच्या) यष्टीच्या प्रवासात ‘प्रवरा-संगम आलं की आजी आम्हाला नदीच्या पात्रात टाकण्यासाठी नाणी द्यायची. आम्ही खूप आनंदाने ती नाणी दूरवर भिरकावायचो! आजी हलकेच डोळे मिटून नमस्कार करायची!


काही वर्षांपूर्वी आजी गेली! आम्ही औरंगाबादहून मुंबईच्या प्रवासाला निघालो. स्वतःच्या गाडीतून जाणार असल्यामुळे, दादांनी माझ्यावर एक अवघड काम सोपवलं होतं..! प्रवरासंगमावर गाडी थांबवली. गाडीतून दादांनी दिलेली पिशवी काढली. त्यातील आजीच्या अस्थी साश्रुनयनांनी प्रवरेच्या पाण्यात सोडताना आजीची नेवाश्याला पाठवणी केली असं वाटून गेलं…नदीचा प्रवाह आजीसारखाच शांत झाल्यासारखा वाटला!Pravra_Sangam.png

 

१४ । आजीच्या बहिणी

Taai_Maai_Akka.png

(ताईआजी छायाचित्र: मंदार कानिटकर)

आजीच्या दोन बहिणी: मध्यभागी माझी आजी, डावीकडे: ताईआजी (कानिटकर) आणि उजवीकडे: अक्काआजी (बागुल, सध्या संगमनेर येथे वास्तव्य). माझ्या आजीला माई म्हणायचे, त्यामुळे मला अनेक दिवस ‘ताई-माई-अक्का, विचार करा पक्का’ ही घोषणा ह्या तिघीवरूनच घेतली होती असं वाटायचं! आमच्या घरी या तिघी बहिणींचं एकत्र रहाणं व्हायचं. आजीसाठी ते दिवस खूपच मौल्यवान असायचे! तिघीही खेळकर स्वभावाच्या असल्याने आम्ही मुलं त्यांच्याशी खूप गप्पा-गोष्टी करायचो! दादा आणि आबाकाका त्यांच्या मावश्यांची खूप थट्टा-मस्करी करायचे, आणि विशेष म्हणजे त्या दोघी अतिशय खिलाडू वृत्तीने त्यात सामील व्हायच्या! ह्या आज्यांच्या काही आठवणी खास तुमच्यासाठी!

मला आठवणारं सगळ्यात पाहिलं एकत्र रहाणं नेवासाच्या घरात. दादांची तिथल्या महाराष्ट्र बँकेत बदली झाली होती, आणि तिथे ह्या बहिणी काही दिवस रहायला आल्या होत्या. आम्हाला सुट्टी असल्यामुळे आम्हीही तिथे होतो. नेवासा सारखं छोटंसं गाव, त्यामुळे तिथे एकमेव विरंगुळा म्हणजे टुरिंग सिनेमा. आम्ही लवकर जेवणं आटोपून थेटरात गेलो. तिथे एका मैदानावर कनात बांधून आत सिनेमा दाखवला जायचा. बसायला आपण काही घेऊन गेलो तर ठीक, नाहीतर मातीत बसायचं! आम्ही सतरंज्या नेल्यामुळे मस्त खाली बसलो. सिनेमा सुरु झाला होता. ह्या तीनही बहिणींना हिंदी भाषेचं अगाध ज्ञान! त्यामुळे सारख्या विचारायच्या, “काय म्हणतोय रे तो?”, किंवा, “ती का चिडली आहे?” वगैरे. आम्ही यथाशक्ती शंका-निरसन केलं. आम्ही मनापासून सिनेमा बघताना सहज मागे वळून पाहिलं तर ह्या तिघी कोंडाळे करून मस्तपैकी पेरूच्या फोडी खात होत्या! तेवढ्या गडबडीत त्यांनी पेरू, सुरी, तिखट-मिठाच्या पुड्या असा सरंजाम आणला होता. “तुला हवा का पेरू?”, ताईमावशींनी विचारलं. मी नाही म्हणताच, त्यांनी पिशवीतून चिवडा काढला…आणि माझ्या ओंजळीत भरला! इकडे, सिनेमाची रीळ बदलली जायची, त्या बरोबर आमचा मेनू बदलायचा..खारेदाणे, साखरफुटाणे, श्रीखंडाच्या गोळ्या, आणि शेवटी कुटलेली सुपारी..असे सर्व त्यांच्या पिशवीतून लीलया बाहेर पडत होते.

अशीच धमाल ह्या तिघी आमच्या घरी आल्या होत्या तेव्हा ही आली होती. ह्या वेळी हे ‘आमचं’ घर होतं. म्हणजे, माझं लग्न झाल्या नंतर थाटलेलं बिऱ्हाड! मी आणि कौमुदी दिवसभर ऑफिसला जायचो. ह्या तीनही आज्या घरी असायच्या, आणि त्यांची धम्माल चालायची! एकतर तिघीना ऐकायला कमी येतं, तरीही त्यांच्या गप्पा अखंड चालू असायच्या! आम्ही घरी आल्यावर आमच्याशी हास्य विनोद! ह्या आज्या आईस्क्रीमच्या शौकीन असल्यामुळे, रात्री आणायचं ठरलं. मी बाहेर निघालो, तर ताई मावशीने सांगितलं, “माझ्यासाठी कप नको…ते त्रिकोणी बिस्कीटातून देतात ते आण”. तिला कोन हवा होतं हे कळायला मला जरा वेळच लागला!

अखेर मी तिच्यासाठी कोन आणला आणि आम्ही आईस्क्रीम खाऊ लागलो. गप्पांच्या नादात आमचं आईस्क्रीम संपलं, पण ताई आजी अजून खात होती! एका ताटलीत तो कोन चमच्याने चपटा करून त्याचे पोळी सारखे तुकडे करून खाणं चाललं होतं. आमची हसून-हसून पुरेवाट झाली!

नाविन्याचा अनुभव घेताना, आपल्याला जमेल कां, किंवा ‘लोक’ काय म्हणतील असले बोजड विचार त्यांच्या बालमनाला कधी शिवले नाहीत. तोंडात एकही दात नसताना कोन मधील आईस्क्रीम खाण्याची गम्मत अनुभवायला तुमचं बालपण शाबूत असायला हवं, हेच खरं!

 

 

 

१३ | आजी आणि तिची भावंडं

आजीची भावंडं हा एका लेखाचा विषय होईल. त्यांच्यातलं प्रेम, आणि एकमेकांविषयी वाटणारी आपुलकी आम्ही काही प्रमाणात अनुभवली आहे. आज राखी पौर्णिमेच्या निमित्ताने, मला आजीच्या भावांबद्दल लिहावसं वाटतंय. आजीच्या बहिणी, हा ही एक महत्वाचा आणि मोठा विषय आहे. पण त्या बद्दल पुन्हा केव्हातरी.

Bandu_Waman_Ananta_Mama.jpg

(छायाचित्र: यश करंदीकर आणि संजय करंदीकर)

आजीला ३ भाऊ होते. खरं म्हणजे ४ होते, पण त्यातील एक, म्हणजे मनुमामा लहानपणीच वारले, त्यामुळे आम्ही त्यांना बघितले नाही. आजीची आई लहानपणी वारली. आजीला २ बहिणी आणि ४ भाऊ. आजीला सावत्र आई होती, पण तिने कोणाला सावत्र वागणूक दिल्याचं आजी बोलली नाही. एका गोष्टीचा मात्र आजी  नेहमी उल्लेख करायची, की आमच्या सावत्र आईला फारसा स्वयंपाक जमायचा नाही, त्यामुळे आम्हा मुलींवर ती जबाबदारी असायची. सर्वात मोठी बहिण ताई, मधली अक्का, आणि माझी आजी. भावंडांमध्ये लहान असलेले अनंता मामा (रांगण्याच्या वयात) दिवा कलंडल्यामुले मानेपाशी भाजले गेले होते. त्या काळी आजीने त्यांचा सांभाळ केला होता. वामन मामा संगमनेरला रहायचे, आणि त्यांचा भविष्यशास्त्राचा अभ्यास होतं. ते औरंगाबादला आले की नानांच्या बरोबर कुंडली, ग्रहदशा, वगैरे विषयांवर चर्चा चालायची. अनंतामामा हस्तसामुद्रिक शास्त्राचे अभ्यासक होते. ते मंत्रालयात नोकरीला होते, आणि माझ्या माहितीप्रमाणे, ते त्यांच्या भविष्य सांगण्यामुळे पूर्ण मंत्रालात प्रसिद्ध होते! बंडूमामा मला फार आठवत नाहीत. ते वाहतूक क्षेत्रात असल्यामुळे आमच्या घरी उशिरा यायचे एवढंच आठवतंय!

आजीच्या तोंडून राखी पौर्णिमेबद्दल फार ऐकलं नाही, पण भाऊबीज चांगली लक्षात राहिलीय! त्याचं एक कारण आहे. भाउबीजेच्या पुढे-मागे काही दिवस, आजीला काही मनी ऑर्डर येत असत. त्यांचे भाऊ: बंडूमामा, वामनमामा, आणि अनंतामामा ह्यांच्या कडून त्या आलेल्या असत. तिला रक्कम महत्वाची नसायची, पण त्या मनी-ऑर्डरच्या फॉर्मच्या खाली कागदाचा तुकडा असायचा, ज्यावर तिच्या भावाने २-३ ओळी लिहिलेल्या असायच्या! साधारणतः खुशालीचं कळवली असायची. परंतु, आजीला ते बोटभर पत्र वाचून अवर्णनीय आनंद व्हायचा. अश्या प्रकारच्या अनेक चिठ्या तिने जपून ठेवल्या होत्या! त्याकाळी दळण-वळणाची साधने फार नसल्यामुळे, आणि भेटी-गाठी वरचेवर होत नसल्यामुळे, त्या बोटभर चिठ्या तिच्यासाठी अनमोल ठेवा होत्या!

 

 

 

 

१२|आवडी-निवडी (भाग १)

peanuts

आजीच्या आवडी-निवडी फारश्या नव्हत्या असं नाही. तिने कधी त्या बद्दल आग्रह धरला नाही, म्हणून त्या लक्षात आल्या नाहीत.

माझ्या आत्यांकडून तिच्या आवडी कळल्या, आणि मग आम्ही त्या पुरवण्याचा प्रयत्न करायचो. त्यातून तिच्या आवडी-निवडी साध्या असल्याने, त्या पूर्ण करण्यासाठी फार सायास पडायचे नाहीत. उदाहरणार्थ, शेंगदाणे. भाजलेले दाणे हा आजीचं सर्वात आवडता पदार्थ होता असे म्हणता येईल. पदार्थांमध्येच नव्हे, तर नुसतेच खायलाही आवडायचे. जेवण झाल्यावरही ती २-३ दाणे ‘मुखशुद्धी’ सारखे खायची! दाण्याचं कूट आणि साखर हे एक आवडीचं ‘डेझर्ट’. हे ‘दाणे’ प्रेम पुढच्या पिढीत उतरलंय. दादा रोज मुठभर खारेदाणे खातात, मी आणि श्रीकांतही आवडीने दाणे खात असतो…फक्त पूर्वीसारखे चड्डीच्या खिशात भरत नाही, इतकंच!

बटाट्याची भाजी तिच्या आवडीची. पण मला आवडते ना, म्हणून कराच, किंवा मला द्या, अशी सांगणारी ती नव्हती! पण तिची शिष्या (माझी आई), एक युक्ती करायची! भाजी झाल्यावर काही फोडी वाटीत घालून, “याची चव बघून सांगता कां? मीठ-तिखट बरोबर झालाय ना?”, असं म्हणीन वाटी पुढे करायची. आजीही आवडीनं, हा सक्तीचा ‘सून’ वास उपभोगायची!

अजून एक आवडीचा पदार्थ म्हणजे चहा! आमच्या घरी चहा घेण्यासाठी कुठलीच वेळ निषिद्ध नाही. अगदी रात्रीचा सिनेमा बघून घरी आल्यावर एखाद्याने जर नुसता विषय काढला, तर सर्व एकमताने; “मला अर्धा कप चालेल”, असं सांगणार! आणि आजीही’ “अरे ही काय वेळ आहे का चहा घायची?”, असं काहीही न म्हणता, “मलाही चालेल”, असं म्हणणार!

तिच्या आवडत्या पदार्थांबद्दल विचार केला तर कळत नाही, की ते तिला आवडायचे? की इतरांना खाऊ घालायला तिला आवडायचे, म्हणून ती करायची? उदाहरणार्थ: गव्हाची खीर, पापडाच्या लाट्या, दहीपोहे, कणकेची धिरडी. हे पदार्थ ती आवडीनं करायची, आणि खाऊ घालायची!

तिच्या इतर बाबतीतल्या आवडी-निवडी नंतरच्या लेखात! तुम्हाला अजून काही आठवत असेल तर प्रतिक्रियांमध्ये लिहा:

११ । आजीचा परम-अर्थ

38943_1564945722584_8036959_n.jpgआजीच्या नऊवारीला पोटापाशी एक छोटी गाठ असायची. आम्ही त्याला केळं म्हणायचो. आजकाल, शिवलेल्या नऊवारीत हा प्रकार दिसत नाही. आजी त्यात थोडे पैसे ठेवायची. कधी सुपारीचं खांड, शेजाऱ्यांनी दिलेली किल्ली, किंवा एखाद्या नातवंडाने, “आजी तुझ्याकडे ठेव, नंतर मला दे”, असा म्हणून ठेवायला दिलेलं चॉकलेट, अश्या वस्तू सहज मावायच्या.

आम्ही आजीला त्यावरून चिडवायचो, “काय ठेवलंय आज त्या केळ्यात?” त्यावर आजी हसून, “काही नाही… माझं डबोलं आहे”, असं गमतीनं म्हणायची. त्याच केळ्यातून आजी विविध घरखर्च चालवत राहायची. सुट्टीत किंवा सणांना मुली, जावई, सुना, मुलं, भाचरं, नातवंडं, पंतवंडं जे जे म्हणून तिला भेटायला येतील, त्यांच्या हातावर (सारखेच), पैसे ठेवायची. आम्हाला जर कोणी असे पैसे दिले, तर ते आम्ही आजीला आणून द्यायचो. त्यामुळे, आजीनं दिवाळीला आम्हाला पैसे दिले तर ते कोणाला द्यायचे, हा आमचा प्रश्न असायचा. मग आजीचं त्यावर उपाय सांगायची, “आईला नेऊन दे”. आजीचं हे आर्थिक नियोजन मस्तच होतं, ज्या मुळे आईकडे पैसे जमा व्हायचे!

पुढे खूप वर्षांनी, नोकरी करायला लागल्यावर अगदी सहज आजीला विचारलं , “माझ्या पगारातून तुझ्यासाठी काय आणू?”. तेव्हा ती म्हणाली, “मला आता काही नको. देवदयेने सगळं आहे. आणि माझ्या गरजा तरी काय आहेत? तू तुझ्या आईला-दादांना घे काय हवे असेल ते”. हो-नाही म्हणता मी काही नोटा तिच्या हातावर ठेवल्या, “असू दे तुझ्याजवळ”. “बरं, ठीक आहे”, असं म्हणून आजीने त्या मुडपून, केळ्यात ठेऊन दिल्या.

पुढच्या दिवाळीत तिच्या नातवंडांना मिळणारी रक्कम वाढल्याचं तिच्या थकलेल्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं!

१०|भक्तीभाव

photo-2018-08-11-11-12-18.jpg

सध्या गणपतीचा विषय सुरु आहे, तर ह्या निमित्ताने मला आजीच्या भाक्तीभावाबद्दल तुम्हाला सांगायला आवडेल. माझी आजी देवभोळी, भाविक, आणि श्रद्धावान होती. माझ्या आजोबांच्या काळी आमच्या १२ x १४ च्या मोठ्या देवघरात पूजा म्हणजे एक सोहळा असायचा. मोठ्या सहाणेवर चंदन उगाळणे, तांब्या, पळी, ताम्हन इत्यादी चिंच लावून चकचकीत करून ठेवणे. घरी वळलेल्या फुलवाती, आणि आमच्या जुन्या समईच्या वाती, असा सगळा सरंजाम ती मनापासून करायची. नाही म्हणायला, आजोबा फुलांचं व्यवस्थापन स्वतः करायचे. खरोखर व्यवस्थापन म्हणावं असं नियोजन असायचं. संध्याकाळी जास्वंदीच्या च्या कळ्या काढून एका तबकात नीट मांडून ठेवायचे. त्याची देठ आत, आणि कळी बाहेर अशी रचना. रात्री त्या तबकात पाणी घालून ठेवायचं. सकाळी ते तबक गुलाबी जास्वंदीच्या फुलांनी अधिकच सुंदर दिसायचे! नानाचं पूजेचं सोवळं, देवपूजेसाठी लागणारी इतर वस्त्र (त्यांना फडकी म्हणायचं नाही!), हे सगळं जागच्या जागी असायचं. आणि आजी ते अगदी मनापासून, आणि आनंदाने करायची, आणि मनोभावे देवाला नमस्कार करायची!

हे एवढे विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे, अश्या पद्धतीची पूजा पाहून आजी जेव्हा माझ्या कडच्या १ x २ च्या देवघरातील, मी ओला टॉवेल गुंडाळून, उभ्याने केलेली पूजा पहायची, आणि इथेही आनंदाने आणि त्याच श्रद्धेने देवाला नमस्कार करायची! मला तिची ही श्रद्धा कायम आठवते. तिने कधी मला माझ्या ‘दिव्य’ साधनेला नावं ठेवली नाहीत, किंवा ‘नानाच्या काळी कसं होतं, आणि आता पहा’, असा रडका सूर काढला नाही, आणि जबरदस्ती तर कधीही केली नाही.

तिच्या पद्धतीने ती ईशसेवा करायची. तिला मी कधी जपाची माळ ओढताना पाहिलं नाही, परंतु दारावर आलेल्या याचकाला कधी विन्मुख जाऊ दिलेलं मात्र पाहिलं नाही. प्रवासात पुलावरून जाताना हमखास चार-आठ आणे नदीच्या पात्रात टाकायची आणि आम्हालाही द्यायची! कोणी देवस्थानाला जाणार असे कळताच, त्यांना आपल्या नऊवारी लुगड्यातील ‘केळ्यातून’ ‘देवापुढे’ ठेवायला पैसे द्यायची!

ह्या नऊवारी लुगड्यातील ‘केळ्या’ वरून तिला आम्ही खूप चिडवायचो! त्याबद्दल पुढच्या लेखात बोलू!