०८ | आजीचं प्रमोशन

Savani_Aaji.png

१९ ऑगस्ट २००२, ह्या दिवशी आजीचं अजून एक प्रमोशन झालं! सावनीच्या जन्माने, ती आता ऑफिशियली पणजी झाली! पणजीचा सहवास नशिबाने मिळतो! मला पणजीचा फार काल सहवास लाभला नाही, परंतु, सावनी ला बराच काळ माझ्या आजीचं सहवास लाभला.

आजी औरंगाबादला असल्याने, तिला सावनीच्या बाल-लीला बघण्याची खूप उत्सुकता असायची. त्या काळी व्हिडियो कॉलिंग नसल्यामुळे, तिला ते दाखवणं शक्य नव्हतं. आवाज ऐकवण्यासाठी फोन करता येई, परंतु, आजीला ऐकू येत नसल्यामुळे, त्याचा उपयोग नव्हता. उलटपक्षी, आजीला ऐकू न आल्याने ती खट्टू व्हायची.

ह्या सर्व प्रकारावर आम्ही एक तोडगा काढला: सावनीच्या विविध गमती-जमती सांगणारं सविस्तर पत्र मी लिहायचो, आणि त्यामधील प्रसंग दर्शवणारी समर्पक चित्रं, माझी पत्नी सौ. कौमुदी काढायची. असं हे चित्रमय पत्र आम्ही आजीला पाठवायचो. आजीला ते वाचून आनंद व्हायचा. आल्या-गेल्याला ते पत्र दाखवायची… तीन गोष्टींचं कौतुक, पणतीच्या लीला, नातवाचं लेखन, आणि नातसुनेची चित्रं!! तुम्हा सर्वांसाठी त्यातलं एक पत्र खाली देत आहे! आज सावनीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या आठवणींना उजाळा मिळाला.Patra02.png

 

 

 

 

Advertisements

०७ |आजीचा बटवा (भाग १)

सर्वसाधारणपणे ‘आजीचा बटवा’, ह्या शीर्षकांतर्गत घरगुती उपचार वाचायला मिळतात. ह्या लेखात ते वाचायला मिळतील , परंतु, दुसऱ्या भागात. आजी वापरत असलेल्या इतर औषधांवर मी ह्या भागात लिहिणार आहे. अर्थात, कोणीही ह्याला जाहिरात समजू नये आणि अनुकरण ही करू नये!

Aaji_Medicines

आजीच्या औषधाच्या पिशवीत काही ठराविक औषधे कायम असायची. सगळ्यात महत्वाचं औषध म्हणजे: अँनासिन. ही डोकेदुखी वरील गोळी म्हणजे आजीचं अक्षरशः टॉनिकच होतं. आम्हाला हक्काने तिने सांगितलेलं  काम म्हणजे ह्या गोळ्या आणून देणं! त्याचं एक कारण होतं: डॉक्टरांनी तिला ह्या गोळ्या घेण्यास मनाई केली होती. त्यामुळे तिने त्या घेऊ नये ह्या मताचे घरचे सगळे होते. कोणीही तिला गोळ्या आणून देत नसत! मग ती हळूच नातवंडांना हे काम सांगून त्या गोळ्या मिळवत असे, आणि तिचा ‘खुराक’ गुपचूप चालू ठेवत असे!

ह्या गोळ्याच्या बरोबरीने ‘अमृतांजन’, हे ही आजीच्या भरवशाचे! रात्री एक हलका लेप कपाळावर दिला, आणि बाटली नाकाशी धरून श्वास घेतला की समजावं, आजीला झोप आली आहे.

आयोडेक्स ह्या मलमावर तिची अपार श्रद्धा होती! आम्हाला खरचटलं, कापलं, किंवा भाजलं, तरी आजीचं एकच म्हणणं असायचं, “त्या जखमेच्या बाजूनं आयोडेक्स लावून ठेव, म्हणजे दु:ख कमी होईल”. आम्हांला तिचं म्हणणं मजेशीर वाटायचं, पण एक-दोन वेळा अनुभव घेतल्यावर आमचीही श्रद्धा बसली!

आयुर्वेदिक औषधांमध्ये सूतशेखर मात्रा आणि त्रिभुवन कीर्ती ह्या रिद्धीसिद्धी प्रमाणे तिच्या पिशवीत ठाण मांडून असायच्या. मला तर ह्या दोन्ही गोळ्या सारख्याच वाटायच्या (आणि सर्व आयुर्वेदिक औषधांप्रमाणे चवीला सारख्याच होत्या!). सावनी त्या गोळ्यांना मसुरीचे दाणे म्हणायची! इतक्या वर्षात कधी मात्रा घ्यायची आणि कधी त्रिभुवन कीर्ती हे कोडं मला अजून सुटलेलं नाही.

पुढे आजीला वयोमाना प्रमाणे इतर काही गोळ्या घ्यायला लागत, पण ह्या औषधांची तिने साथ सोडली नाही!  त्या गोळ्या ती फार उत्साहाने घेत नसे. अपवाद म्हणजे नातवंड जवळ असतील तेव्हा, ती त्यांच्या समोर तोंड उघडून बसायची, आणि ती मुलं तिच्या तोंडात त्या गोळ्या टाकायची, असा हा प्रेमळ ‘गोळीबार’ चालायचा!

 

 

०६ | नाती जपणं: आजीचं UX design (भाग २)

Aaji001

भाजीवाल्या बायकांचं एक वेगळंच नातं आजीशी जडलेलं होतं. त्यांच्या जेवणाच्या वेळी (दुपारी ३-४) आमच्या भागातील भाजीवाल्या घराच्या मागच्याबाजुला असलेल्या ‘outhouse’ समोरच्या मोकळ्या जागेत जमायच्या. भाज्यांची पाटी (टोपली) समोर ठेऊन कनवटीची चंची सोडून त्यातील नोटा पाटीवरच्या बारदानावर काढून ठेवणार, तेवढ्यात आजी आतून तिची छोटीशी वामकुक्षी आटपून पायरीवर बसायची. मग प्रत्येकीचा हिशोब सुरु! “कितीची पाटी भरलीस आज?”, आजीचा प्रश्न. “शंभरवर तीस झाले होते”, इति भाजीवाली. “शंभर वर सात झाले आहेत आजी, अजून किती करायला हवेत?”, मग आजी तिला पाटीची किंमत भरून येण्यासाठी, किती पैसे लागतील, आणि वरचे सगळे नफ्यात जमा, असा हिशोब सांगणार, आणि दुसऱ्या भाजीवालीचं Audit सुरु करणार! हे सर्व खाणाखुणांनी चालायचं! तिथे असलेल्या नळाच्या पाण्याने त्या बायका भाज्यांवर पाणी मारून ताज्या टवटवीत करायच्या. मधल्या काळात आम्ही त्या सर्वांसाठी पाणी आणायचो, आणि आजी मधेच कधीतरी आम्हालाही हिशोब करायला लावायची! आम्ही बोटं मोडत, आणि सतरांदा चुकत एखादं उत्तर देई पर्यंत आजी पावकी, निमकी, औटकी, सव्वाकी, दिडकी, अडीचकी वगैरे वापरून, सगळ्यांचे हिशोब करून आमच्या घरासाठी लागणारी भाजी घेऊन आत गेलेली असायची! आजी कडून हे पाढे शिकलो नाही, ह्याचं राहून-राहून वाईट वाटतं.

UX Design च्या तत्वानुसार, तुमच्या ग्राहकाची गरज लक्षात घेणे ही उत्तम निर्मितीची पहिली पायरी आहे. आजीला हे तत्व कसं माहित होतं कोण जाणे? पण तिनं ते आयुष्यभर पाळलं. तिला भेटणारी व्यक्ती, मग ती लहान-मोठी, नातेवाईक-अनोळखी, उच्चशिक्षित-अशिक्षित, कोणीही असो, तिने त्या व्यक्तीची गरज ओळखून त्याप्रमाणे तिला वागणूक दिली!

बाकी सगळ्या उदाहरणापेक्षा, आमच्या घरी गेली ४० वर्ष काम करणाऱ्या रमाबाई बद्दल असलेली तिची आत्मीयता मला भावते! रमाबाईला सगळी कामं करताना डबा आणायला जमत नाही, त्यामुळे, तिच्यासाठी जेवण आमच्या घरीच बनवलं जातं. मागे एकदा मी घरी असताना, आजीने आईला सांगितलं, “उद्यासाठी साबुदाणा भिजत घाल”. माझ्या माहितीप्रमाणे आजीने तेव्हा उपास करणे सोडून दिले होतं, म्हणून, मी तिला विचारलं, “कोणाचा उपास आहे?, तु उपास परत सुरु केले का?”. त्यावर ती म्हणाली, “अरे, रमाचा उद्या उपास असतो. तिला घरी पोळी-भाजी नीट मिळत नाही, उपासाचं कुठून मिळायला?, म्हणून तिच्यासाठी थोडी खिचडी करणार आहे”.

माझ्या लक्षात आलं, आजीला उपास करायची गरजच काय, तिला पुण्य तर मिळतंच आहे!

 

 

 

०५ | पत्ते

 

aaji_patte.jpg

(चित्र: सौ. कौमुदी सहस्रबुद्धे | लेखाची कल्पना: माझी आत्या: सौ. मंदाकिनी कर्वे)

आजीचा एक आवडता विरंगुळा, म्हणजे पत्ते खेळणं.  त्यातील अनेक खेळ ती आवडीने खेळायची. परंतु, एकटी असताना पेशन्स तिला मनापासून आवडायचा. त्याच बरोबर ती अजून एक डाव खेळायची. मला त्याचा नाव माहित नाही, परंतु, त्यामध्ये सर्व पाने उघडी करून १३ पाने एका रांगेत आणि अश्या ४ रांगा, असे काहीसे स्वरूप होते (जाणकारांनी त्या खेळाचे नाव सांगावे!). हे दोन्ही खेळ आवडण्याचं प्रमुख कारण म्हणजे ह्या मध्ये बोलणं-ऐकणं गरजेचं नसायचं! रात्री अनेकदा झोप येत नसल्यास आजीला पेशन्सचा डाव लावताना पाहिलं की कसंसंच व्हायचं. त्यावेळी तिला जर विचारलं की दोन डाव खेळू का, तर ती नको म्हणायची नही, पण दुसऱ्या डावाची पानं वाटता-वाटता, “हा शेवटचा डाव हो, मग झोप तु, उद्या शाळा आहे ना? नाना ओरडतील!” असं म्हणायची.

आजीच्या रमी खेळण्याची एक मजेशीर आठवण आहे. आमच्या घराच्या outhouse मध्ये ताईआजी (नानांची बहिण), रहात असत. त्यांच्या खोलीत मी आणि श्रीकांत (माझा घाकटा भाऊ), खाली गाद्या घालून झोपत असू. रात्रीची जेवणं आणि आवराआवर झाली की आजी तिथे येत असे. त्या नंतर त्या दोघी रमीचे मोजून १३ डाव खेळत! म्हणजे एक्क्या पासून ते दुर्री पर्यंत. दोघीही अवाक्षर न बोलता हे डाव खेळायच्या! मी आणि श्रीकांत एकसारखे उठून कुठला जोकर चालू आहे ते पहायचो! आणि मनातल्या मनात अजून किती डाव उरलेत, आणि किती वेळ ते चालतील ह्याचा हिशोब करत रहायचो. अगदी मनापासून झोपण्याचा प्रयत्न करायचो, कारण १३ डाव संपले की दिवा बंद व्हायचा आणि अंधारात आम्हाला झोप यायची नाही.

आधी नातवंडांना आणि मग पंतवंड झाल्यावर त्यांना, तिने पत्त्यांची रीतसर दीक्षा दिली!  भिकार-सावकाराचा श्रीगणेशा झाल्यावर मग रमी, बदामसात, झब्बू, गुलामचोर, अशी चढती भाजणी असायची! रात्री आमच्याकडे सावनीला (माझ्या मुलीला), नजरेनेच बोलवून त्यांचे डाव चालू व्हायचे…मग मी जर सावनीला लवकर झोपायला जा, असे सांगितलं, तर आजी खोटा आव आणून, “शेवटचा डाव खेळून लगेच झोपायला जायचं काय सावनी? मग सकाळी उठायला आणि शाळेला उशीर होतो नां!”, असा ‘सज्जन’ दम भरायची, आणि दोघी हसून पुढे ३-४ डाव आरामात खेळायच्या!

आजीच्या काळी मोबाईल नव्हते तेच ठीक होतं! रात्री अंधारात मोबाईलवर पत्ते खेळणारी आजी बघवली नसती! आपण पुढच्या पिढीला कसे आजी-आजोबा दाखवणार आहोत?

 

०४ | नाती जपणं: आजीचं UX design

Aaji002मी आधी म्हणाल्या प्रमाणे, माझ्या आजीला ऐकू येत नसे. त्या पार्श्वभूमीवर, तिचा लोकसंग्रह आणि जनसंपर्क खूपच होता. आमच्या घरी येणाऱ्या भाजीवाल्या बायकांपासून, ते थेट माझ्या वडीलांच्या साहेबांपर्यंत, आजीला सगळे ओळखायचे, आणि आजीही सगळ्यांना ओळखायची!

तिचा ‘दुसऱ्या व्यक्तीला कुठल्या वस्तूने/शब्दाने/क्रियेने बरं वाटेल, ह्याचा विचार ती कायम करायची. अलीकडे संशोधनाच्या निमित्ताने ह्याला User Experience Design असे भारदस्त नाव आहे हे कळले! नाते-संबंध जपण्याचा आजीचा हा गुण तिच्या पश्चात प्रकर्षाने जाणवतो. आज आम्हाला ‘तिची’ मुलं/नातवंड ह्या ‘ओळखी’मुळे अनेक लोकांचा स्नेह मिळतो. त्या स्नेहामागे तिने त्या व्यक्तीला दिलेली प्रेमळ वागणूक कारणीभूत आहे हे नक्की. माझी ही लेखमाला ‘आजी’ ह्या विषयावर आहे, असे कळल्यापासून सर्वच माध्यमातून तिच्या आठवणींचा वर्षाव झाला आहे, सुरु आहे!

अगदी साधं उदाहरण घ्यायचे तर,  घरातील पदार्थ आणि लोकांची आवड, ह्या दोन्हीची सांगड कायमच घातलेली असायची! नितुताई साठी भोपळ्याचे घारगे, माझ्या सासरेबुवांसाठी आल्याच्या वड्या, वैशंपायन काकांसाठी चिवडा, मुलींसाठी पापडाच्या लाट्या, ह्या नातवासाठी शेवयाची खीर, तर त्या नातवासाठी रव्याची, अमुक एकासाठी कुळीथ पिठलं, तर तमुक व्यक्ती साठी खव्याच्या पोळ्या! एक ना अनेक!

ह्याच स्वभावामुळे, मला ती आजोबांच्या कडक शिक्षेतून वाचवायची. मला फळं अजिबात आवडत नाहीत (अपवाद: केळ आणि आंबा). त्यामुळे घरी fruitsalad केले असे, त्या दिवशी माझी अवस्था दयनीय होत असे. त्यात भर म्हणजे, नाना (माझे आजोबा), माझ्या ताटाकडे लक्ष ठेऊन असायचे, आणि मला fruitsalad वाढले जातेय की नाही हे पहायचे! त्यांना साथ देण्यासाठी माझी भावंडं तयारच असायची! आणि मी जर वाटीत थोडं fruitsalad टाकलं, की माझी तक्रार तत्परतेने पोहोचवली जायची. ह्या सगळ्या पहाऱ्यामध्ये, आजी शांतपणे माझ्या ताटात भरलेली वाटी ठेवायची. मी चेहऱ्यावर काकुळतीचे भाव आणून मूक निषेध करायचो. भावंडं खुसू-खुसू हसायची. नाना डोळे वटारायचे, आणि मी खाली मान घालून निमुटपणे जेवण सुरु करायचो. मोठ्या कष्टानं fruitsaladच्या वाटीत पोळीचा तुकडा घातला, की एकदम जाणवायचं की ही तर फक्त केळ्याची शिकरण आहे. वर मान केल्यावर गालातल्या गालात हसंणारी आजी दिसायची!

(क्रमशः)

 

 

 

 

 

०३ | आजीची पत्रं

Aaji_Patra01

आज आजीबद्दल विचार करता-करता तिची पत्रं आठवली. तिची पत्रं फार अलंकारिक नसायची, पण त्यामधून माहिती देणं, हे सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट असायचं. तिला ऐकू येत नसल्याने, फोन तिच्या साठी निरुपयोगी होता. त्याऐवजी, ती पत्रांवर विसंबून रहायची. माझं लग्न झाल्यावर मी आणि कौमुदीने चित्रमय पत्रं तयार करायला सुरुवात केली! सावनीच्या जन्मानंतर तर आम्हांला पाक्षिक चित्रमय पत्र पाठवण्याची सक्त ताकीद होती. तिची आलेली अनेक पत्रं मी जपून ठेवली आहेत, आणि त्यातून तो प्रसंग, आणि ती वेळ पुन्हा अनुभवता येते!

आता वरील पत्र बघाना, डावीकडे वरच्या बाजूला ‘चि. श्रीकांत येत आहे, त्याच्या बरोबर चिट्ठी देत आहे’, अशी माहिती आहे. कोणीही प्रवासाला जात असल्यास त्याच्या प्रवासाच्या ठिकाणी जे रहात असतील त्यांच्यासाठी पत्र ठरलेलंच असायचं. पत्रामध्ये, तिच्या घरातील सगळ्यांच्या बद्दलची माहिती असायची, आणि ज्यांना पत्र पाठवते आहे, त्यांच्या घरातील सगळ्यांची चौकशी!! आम्हाला आलेल्या सर्व पत्रांमध्ये, आमच्या तब्येतीची विचारपूस ठरलेली… काहीवेळा ते वाचून आम्हाला आमच्या वयाची शंका यायची! आम्ही तिच्या तब्येतीची चौकशी करायची की तिने आमच्या?

माझ्याकडे असलेल्या पत्र संग्रहातून तिची पत्रं काढली. वाचता-वाचता, लहान झालो, त्या काळात फिरून आलो.

aaji_patra02.png

 

 

 

 

 

 

 

 

०२ | आजीच्या वड्या

Vadya.jpg

(छायाचित्र आणि वड्या: सौ. कौमुदी सहस्रबुद्धे)

माझ्या आजी बद्दल कोणी बोलायला लागलं, की ‘तिच्या हातच्या वड्या’ हा विषय अपरिहार्य असतो. कुठल्याही क्षणी आलेल्या पाहुण्याला ‘हातावर’ ठेवण्यासाठी तिच्या वड्या कायम तयार असत. बरं, त्यात विविधता खूपच होती. रवा-बेसन, रवा-नारळ, गुलपापडी  ह्या सारख्या ‘नेहमीच्या’ वड्यांपासून ते अगदी तुपाच्या बेरीच्या वड्या, ऋतूमानाप्रमाणे उपलब्ध असलेल्या  फळांच्या आणि भाज्यांच्या ही वड्या: आंबे, गाजर, टोमॅटो, मटार, आलं, बटाटा, अश्या सगळ्या वड्या ती करायची. ह्या सर्व वड्या तिने वाचून, किंवा प्रयोग करून शिकल्या होत्या हे विशेष!

इतक्या वड्या करणाऱ्या आजीला, मी कधी पूर्ण वडी खाताना पाहिलं नाही. वडी खाताना आपण साधारणपणे दोन बोटात वडी पकडून समोरच्या दातांनी तुकडा तोडतो (वडी मऊ असल्यास, नाहीतर, वडीऐवजी दाताचा तुकडा पडायचा!). पण आजी वडीचा तुकडा बशीत तोडून मग तोंडात टाकायची. कुतूहल म्हणून मी एकदा आजीला ह्याचं कारण विचारलं. तेव्हा आजी म्हणाली, “दातांनी वडी तोडल्यावर, जर कोणी समोर आलं, तर उष्टी झालेली वडी देता येत नाही, त्यामुळे, हाताने तुकडा तोडायची सवय लागली!”.

तिची आणखीन एक सवय होती. आमच्या घरी वड्या शक्यतो, घरात फारशी वर्दळ नसताना केल्या जायच्या! मग आम्ही खेळून आलो, आणि देवासमोर स्तोत्रं म्हणायला बसलो, की देवासमोरच्या पाटाखाली एखादं ताट दिसायचं. त्या थापलेल्या सारणाच्या वड्या पाडण्याची नाजूक जबाबदारी घेण्यासाठी आमच्यात चुरस असायची. त्याचं कारण म्हणजे, नैवेद्य दाखवल्या नंतर चौकोनी वड्या कापल्यावर उरणारे त्रिकोणी भाग मटकवायला मिळायचे! मला नेहमी त्या पाटाखालच्या जागेबद्दल कुतूहल असायचं. मी त्याबद्दल आजीला एकदा विचारलं, तेव्हा ती म्हणाली, “आपण गोड-धोड करतो, आणि छोट्याश्या वाटीत घालून, काही क्षणांसाठी देवाला ‘दाखवतो’, हे बरं नाही. म्हणून ते ताट तिथे ठेवायचं! आणि अजून एक गम्मत म्हणजे, तिथे ठेवलं की माझ्या वड्या कधी बिघडत नाहीत!!”.

आजी गेल्यावर, तिची आठवण म्हणून माझ्या पत्नीने वड्या थापायचा चौकोनी ट्रे घेतला. त्यात वड्या थापताना आणि कापताना जो सुटसुटीतपणा जाणवला, तेव्हा मनात विचार आला, “आजीने कधी असा ट्रे का नाही घेतला?” उत्तर आपसूक आलं, “आम्हांला त्रिकोणी वड्या मिळाव्या म्हणून!”